तुम्हाला पुण्य पाहिजे की पाप?

home / तुम्हाला पुण्य पाहिजे की पाप?

अकबर आणि बिरबल यांच्या कथा नेहमीच माणसाला विचार करायला लावतात. “तुम्हाला पुण्य पाहिजे की पाप?” ही कथा नक्की वाचा. A moral Akbar Birbal story teaching the value of right decisions.

एकदा सहज बोलण्याच्या ओघात बिरबल म्हणाला- ‘या जगामध्ये बुद्धी हे अस्त्र सर्वांत प्रभावी आहे.’ बिरबलाच्या या बोलण्यावर बादशहाने त्याला आव्हान दिले- ‘बरं, ठीक आहे. मग मी असे करतो. तुला उदेपूरच्या माझ्या मांडलीक राजाकडे पाठवितो. तसेच तुझा शिरच्छेद करण्याचे एक पत्रही तुझ्यासोबतच देतो, आणि तू बुद्धीच्या शस्त्राने आपले प्राण कसे वाचवितोस ते पाहतो.’ इतक्यात बिरबलाचा द्वेष करणारे मुसलमान सरदार बादशहाला हळू आवाजात म्हणाले- ‘खाविंद, हा कदाचित पळून जाईल, तेव्हा त्याच्याबरोबर आम्हालाही जाण्याची परवानगी द्या.’ बादशहाने त्यांना होकार दिला.

बिरबलाने ते पत्र उदेपूरच्या राजाच्या हातात देताच तो राजा म्हणाला-‘बिरबलजी, तुम्ही तर बादशहाच्या गळ्यातले ताईत आणि तरीही त्यांनी तुमचा शिरच्छेद करण्याचे पत्र मला का बरे पाठवले असावे?’

बिरबल त्या राजाला एका बाजूला घेऊन हळू आवाजात म्हणाला-‘महाराज, हे सर्व कारस्थान माझ्यावर जळणाऱ्या मुसलमान सरदारांचे आहे. त्यांनी खाविंदांना प्रमाणापेक्षा जास्त दारू पाजून गाफीले केले आणि त्यांच्याकडून दारूच्या नशेतर या पत्रावर शिक्कामोर्तब करवून घेतले. त्यामुळे खरे म्हणजे खाविंदांना यातले काहीच माहीत नाही. माझ्या बरोबरील हे चार सरदार ह्या कारस्थानाचे खरे सूत्रधार आहेत. माझा शिरच्छेद होताच हे सर्व दिल्लीस गेल्यावर शंभर गाई कापून त्याची मेजवानी दिल्लीतल्या धर्मांध मुस्लीमांना देणार आहेत. याउलट तुम्ही जर मला जिवंतपणी परत पाठविले तर मी शंभर गाई दिल्लीतल्या शंभर विद्वान ब्राह्मणांना दान म्हणून देईन. तेव्हा विचार करा. तुम्हाला पुण्य पाहिजे की पाप पाहिजे. व नंतरच ठरवा मला सोडून द्यायचे का मारायचे?’

बिरबलाने अशा प्रकारे खुलासा करताच त्या राजाने बिरबलावर जळणाऱ्या त्या सरदारांचाच शिरच्छेद केला व बिरबलाला अनेक मौल्यवान भेटी देऊन त्याच्या बरोबर बादशहाला देण्यासाठी एक पत्र दिले- ‘खाविंद, आपल्याला भरपूर दारू पाजून त्या गाफीलपणाचा फायदा घेत नको त्या पत्रावर आपले शिक्कामोर्तब मिळविणाऱ्या त्या चार कारस्थानी सरदारांचा मी शिरच्छेद केला आहे. आणि आल्या गळ्यातील ताईत असणाऱ्या आपल्या प्रिय बिरबलाला जिवंत ठेवून परत पाठवीत आहे.’ ते पत्र वाचून बादशहा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला-‘बिरबल, जगातील सर्वांत प्रभावी शस्त्र बुद्धी हेच आहे हे आता मला पटले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags