नमस्कार मित्रांनो, मी दिलीप जगताप. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक भयानक अनुभव सांगणार आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ही गोष्ट आहे ३० वर्षांपूर्वीची, जेव्हा मी, अरुण, अशोक आणि प्रमोद आमच्या तरुणपणीच्या धाडसी मैत्रीत रमलेलो होतो. आम्ही चौघेही लहानपणीचे मित्र. आम्हाला साहस, फिरणे, आणि मजा करणे याची इतकी आवड होती की, आमच्या गावात आमची मैत्री प्रसिद्ध होती. किल्ल्यांवर जाणे, जंगलात कॅम्पिंग करणे आणि उंच डोंगरांवर ट्रेकिंग करणे हे आमचे आवडते छंद. प्रत्येक संध्याकाळी गावच्या चौकात जमून आम्ही नवीन साहसाच्या योजना आखायचो. त्या काळात आम्ही तरुण होतो, आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण आम्हाला पूर्णपणे जगायचा होता. त्या संध्याकाळीही असंच काहीसं घडलं.
गावच्या चौकात आमच्या गप्पा रंगल्या होत्या. अरुणने नेहमीप्रमाणे उत्साहाने विचारलं, “यावेळी कुठे जायचं? काहीतरी भन्नाट ठिकाण हवं, जिथे खूप ॲडव्हेंचर मिळेल!” आम्ही सगळे ठिकाणं सुचवू लागलो. कोणी म्हणालं, “कोकणात जाऊया, समुद्रकिनारी मजा येईल.” कोणी म्हणालं, “सह्याद्रीत ट्रेकिंग करूया.” पण कुणालाच काही ठोस ठिकाण सुचत नव्हतं. बोलता बोलता अशोकने सहज म्हणून टाकलं, “बेताळवाडी… बेताळवाडी जायचं का?” त्याचं नाव ऐकताच आम्ही सगळे एकमेकांकडे पाहू लागलो. बेताळवाडी हे नाव आमच्या गावात भयानक कथांसाठी प्रसिद्ध होतं. आमच्या गावापासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर, एका उंच डोंगरावर वसलेलं हे गाव, “भूतांचं गाव” म्हणून ओळखलं जायचं.
“बेताळवाडी?” अरुणने घाबरट आवाजात विचारलं, “तिथे तर भुतं राहतात म्हणे! तिथल्या जंगलात रात्री भयानक आवाज येतात, आणि लोकांना विचित्र गोष्टी दिसतात!” प्रमोदनेही होकार देत म्हटलं, “हो, माझे मामा सांगत होते, तिथे रात्री कोणी गेलं तर परत येत नाही!” मी आणि अशोक हसलो. “अरे, भुतं-वुतं काही नसतं! सगळ्या अंधश्रद्धा आहेत,” अशोकने आत्मविश्वासाने सांगितलं. “आपण धाडसी आहोत, मग काय घाबरायचं? जाऊया बेताळवाडीला!” मीही त्याला पाठिंबा दिला, “होय, असं काही ठिकाण पाहिलं पाहिजे जिथे आपली हिम्मत आजमावली जाईल!” खूप वादविवाद आणि खूप जबरदस्ती केल्यानंतर अरुण आणि प्रमोद तयार झाले. आमचा दोन दिवसांचा बेताळवाडीचा प्लॅन ठरला.
अशोककडे त्यावेळी एक जुनी पण मजबूत जीप होती. “उद्या सकाळी ७ वाजता चौकात भेटू, आणि जीपनेच निघू,” अशोकने सांगितलं. घरी पोहोचताच आम्ही सगळ्यांनी पॅकिंगला सुरुवात केली. दोन दिवसांसाठी लागणारं सगळं सामान, कपडे, खाण्याचं सामान, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, आणि इतर आवश्यक गोष्टी, आम्ही काळजीपूर्वक पॅक केल्या. रात्री झोपताना माझ्या मनात थोडी भीती होती, पण उत्साह त्या भीतीपेक्षा जास्त होता. “काय होतंय तिथे? आपण सगळे मिळून जाणार आहोत, काही होणार नाही,” मी स्वतःला समजावलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता आम्ही चौकात जमलो. अशोक आधीच जीप घेऊन तिथे हजर होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह होता, पण अरुण आणि प्रमोदच्या चेहऱ्यावर थोडी भीती स्पष्ट दिसत होती. “काय रे, घाबरताय का?” मी त्यांना चिडवत विचारलं. “नाही रे, पण त्या गावाबद्दलच्या कथा…” अरुण बोलता बोलता थांबला. “कथा म्हणजे कथा! आपण सत्य काय ते पाहू,” अशोकने जीपचा दरवाजा उघडत म्हटलं. आम्ही सगळ्यांनी आपल्या बॅगा जीपच्या मागे ठेवल्या, आणि प्रवासाला सुरुवात झाली.
प्रवास खूप मजेत चालला होता. आम्ही आळीपाळीने जीप चालवत होतो. रस्त्यावर गाणी लावली, गप्पा मारल्या, आणि मधेच थट्टामस्करी करत होतो. “पाहा, बेताळवाडीला गेल्यावर आपण तिथल्या भुतांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं की, ‘आम्ही संतोष अँड गँग आलोय!’” मी हसत हसत म्हणालो. सगळे हसले, पण अरुणच्या हसण्यात थोडी भीती दडलेली होती. सूर्य डोक्यावर आला तसा आम्ही बेताळवाडीच्या जवळ येत होतो. सुमारे ४५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाल्यावर आम्ही एका छोट्या गावात थांबलो, जिथे आम्ही चहा पिण्यासाठी आणि काही खाण्याचं सामान खरेदी करण्यासाठी उतरलो.
त्या गावातल्या दुकानात आम्ही चहा मागवला आणि बेताळवाडीबद्दल बोलायला सुरुवात केली. “तिथे खरंच भुतं असतील का?” प्रमोदने विचारलं. “अरे, भुतं नसतात! पण त्या गावात काहीतरी गूढ आहे हे नक्की,” अशोक म्हणाला. आमच्या गप्पा ऐकून दुकानदाराने आमच्याकडे पाहिलं आणि दबक्या आवाजात म्हणाला, “साहेब, तुम्ही कुठून आलात? आणि बेताळवाडीबद्दल काय बोलताय? तिथे जाऊ नका, ते गाव शापित आहे!” त्याचा आवाज ऐकून आम्हा सगळ्यांना धक्का बसला. “काय म्हणता? शापित म्हणजे?” मी विचारलं. दुकानदाराने गंभीर चेहरा करत सांगितलं, “तिथे रात्री भयानक गोष्टी घडतात. लोकांना विचित्र आवाज ऐकू येतात, आणि काही लोक तर परत आलेच नाहीत!”
“अरे, सगळ्या गप्पा आहेत!” अशोकने हसत त्याला टाळलं. “आम्ही फिरायला चाललोय, काही होणार नाही.” दुकानदाराने आम्हाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. “साहेब, माझं ऐका, तिथे जाऊ नका. त्या गावात काहीतरी भयंकर आहे. रात्री तिथे कुणीही राहत नाही.” पण आम्ही ऐकलं नाही. “एवढ्या लांब आलोय, आता मागे फिरणार नाही,” अशोक ठामपणे म्हणाला. आम्ही चहा पिऊन, काही खाण्याचं सामान खरेदी केलं आणि जीपकडे परतलो.
बेताळवाडीच्या दिशेने निघाल्यावर काही किलोमीटर अंतरावर एक रस्ता आला, जिथे मोठमोठे दगड रचलेले होते, जणू कोणीतरी मुद्दाम रस्ता बंद केला होता. “हे बघ, कुणीतरी रस्ता बंद केलाय!” अरुण घाबरट आवाजात म्हणाला. “काही नाही, आपण दगड हटवू,” अशोकने जीप थांबवत सांगितलं. आम्ही सगळे उतरलो आणि त्या दगडांना बाजूला केलं. रस्ता मोकळा झाला होता, आणि आम्ही पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडी होती, आणि निसर्गरम्य वातावरण पाहून आम्हाला बरं वाटलं. पण रस्त्याची अवस्था खूपच खराब होती. खड्ड्यांनी भरलेला तो रस्ता जणू कित्येक वर्षांपासून न बनवलेला होता.
संध्याकाळचे सात वाजले असतील, आणि अंधार पडायला लागला होता. जीपच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात बेताळवाडीचं प्रवेशद्वार दिसू लागलं. ते इतकं जुने आणि मोडकळीला आलेलं होतं की, पाहताच भीती वाटली. गावात शिरताच एक माणूस दिसला, वय साधारण ५० असेल. त्याने पांढरे, मळकट कपडे घातले होते, आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. “कोण आहात तुम्ही? इथे काय करताय?” त्याने विचारलं. “आम्ही फिरायला आलोय, दोन दिवस राहायचं आहे,” मी उत्तर दिलं. तो आमच्याकडे काही क्षण पाहत राहिला, आणि मग म्हणाला, “चला, मी तुम्हाला राहायला जागा दाखवतो.”
त्याने आम्हाला एका घराकडे नेलं. ते घरही खूप जुनं आणि जीर्ण अवस्थेत होतं. खिडक्या तुटलेल्या, भिंतींना भेगा पडलेल्या, आणि आतून एक विचित्र वास येत होता. “इथे राहणार का तुम्ही?” त्याने विचारलं. आमच्याकडे पर्याय नव्हता, त्यामुळे आम्ही होकार दिला. त्याने आम्हाला कसल्यातरी वनस्पतींपासून बनवलेला चहा आणून दिला. “हे प्या, थकवा जाईल,” तो म्हणाला. चहाला एक कडवट चव होती, आणि मला थोडा संशय आला. “यात काही नाही ना?” मी अशोकला हळूच विचारलं. “काही नाही, मी पितो,” अशोकने चहाचा घोट घेतला. त्याला काही झालं नाही, म्हणून आम्ही सगळ्यांनी चहा प्यायला. बोलता बोलता मी त्याला सहज विचारलं “काका तुम्ही या गावात केव्हापासून राहताय?” तो हसत हसत म्हणाला “दिडशे वर्षापासून”. मीही हसत म्हणालो “काय काका तुम्हीपण मस्करी करताय आमची”. तो फक्त थोडे हसला आणि काहीच बोलला नाही. काही वेळाने तो माणूस तिथून निघून गेला, आणि अरुणने त्याला पलीकडच्या एका घरात जाताना पाहिलं.
आम्ही घरात सामान ठेवलं आणि आसपास पाहिलं. घरात नळाला पाणी येत होतं आणि विजेचीही सोय होती, जे इतक्या दूरच्या गावात आश्चर्यकारक होतं. “हे बघ, इतक्या जुन्या गावात पाणी आणि वीज आहे!” प्रमोदने आश्चर्याने सांगितलं. “काहीतरी गडबड आहे,” अरुणने शंका व्यक्त केली. रात्री आम्ही जेवण करून झोपायला तयार झालो. पण रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक कुत्र्यांचे भुंकणे सुरू झाले. मी उठलो आणि दरवाजा उघडून बाहेर पाहिलं, पण बाहेर कुणीच नव्हतं. ना कुत्रे, ना माणसं. मी परत आत आलो, आणि पुन्हा भुंकण्याचा आवाज आला. मी पुन्हा दरवाजा उघडला पण कुणीच नव्हत. मी घरात आलो. पण पुन्हा तोच कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज. “काय आहे हे?” मी घाबरत म्हणालो. यावेळेस अशोकने दरवाजा उघडला, आणि त्याला काही कुत्रे दिसले, जे भुंकत होते. पण जेव्हा आम्ही टॉर्च मारली, तेव्हा तिथे कुणीच नव्हतं.
रात्रभर विचित्र आवाज येत राहिले. कधी प्राण्यांचे किंचाळणे तर कधी हवेतून येणारा आवाज. आम्ही सगळे घाबरलो होतो, पण एकमेकांना धीर देत होतो. “काही नाही, सकाळी सगळं ठीक होईल,” अशोक म्हणाला. पण त्याचा आवाजही थरथरत होता. दिवसभर थकलेलो असल्याने आम्ही कधी झोपलो समजलेच नाही. सकाळी उठल्यावर आम्ही गावाची सैर करायला निघालो. गावातली प्रत्येक घरं एकसमान आणि जीर्ण होती. जणू सगळी एकाच साच्यात बनवलेली एकसमांतर घरे. एखाद्या माणसाने सर्व घरांची समान बांधणी केलेली असावीत इतकी हुबेहूब घरे होती. आम्हाला तर विश्वासच बसला नाही. “हे काय आहे? सगळी घरं एकसारखी का दिसतात?” प्रमोदने विचारलं. “काहीतरी गडबड आहे,” मी म्हणालो, पण माझ्या मनातही शंका होती.
गावात एकही मंदिर किंवा शाळा नव्हती, जे खूपच असामान्य होतं. या गोष्टीने आम्हा सर्वांना चकित केले. गावात फारच कमी लोक होते आणि बहुतांश तर म्हातारे होते. आम्ही काही लोकांशी बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की तरुण लोक रोजगारासाठी शहरात गेलेत, आणि इथे फक्त म्हातारी माणसं राहतात. फिरता फिरता आम्हाला गावच्या दुसऱ्या टोकाला एक छोटा किल्ला दिसला, तोही जीर्ण अवस्थेत होता. आम्ही दिवसभर गावात आणि आजुबाजूच्या परिसरात फिरलो, पण प्रत्येक गोष्ट आम्हाला गूढ वाटत होती. संध्याकाळी परत घरी आलो आणि थोडी विश्रांती घेतली. आणि गप्पा मारत बसलो. “उद्या सकाळी निघूया का?” अरुणने विचारलं. “हो, मलाही इथे जास्त काळ राहायचं नाही, इथे तर पाहण्यासारख सुद्धा काहीच नाही आहे.” प्रमोद म्हणाला.
रात्री आमच्याकडे खाण्यासाठी फारसं काही उरलं नव्हतं. म्हणून मी आणि अरुण त्या माणसाकडे काहीतरी खायला मिळेल का हे पाहायला गेलो. रात्रीचे साडेदहा वाजले असतील, बाहेर खूप अंधार होता, आणि फक्त काही घरांच्या बल्बचा सौम्य प्रकाश रस्त्यावर पडत होता. आम्ही टॉर्च घेऊन त्या माणसाच्या घराकडे गेलो. त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला, पण कोणी दार उघडलं नाही. मी पुन्हा ठोठावलं, आणि अचानक दरवाजा उघडला, पण तिथे कुणीच नव्हतं. “काय आहे हे?” अरुण घाबरला. आम्ही हळूच आत शिरलो, आणि जे पाहिलं त्याने आमच्या अंगावर काटा आला.
आम्ही ज्या घरात राहत होतो, त्या घराची आणि या घराची रचना अगदी हुबेहूब होती. त्याच भेगा पडलेल्या भिंती, त्याच तुटलेल्या खिडक्या, आणि तेच फर्निचर. “हे… हे आपलंच घर आहे का?” मी थरथरत्या आवाजात विचारलं. “नाही, आपलं घर तर पुढे आहे!” अरुण म्हणाला. मग माझी नजर भिंतीवरच्या एका फोटोवर गेली. कारण फक्त हा फोटोच ह्या घरात एक वेगळी वस्तू होती. तो फोटो पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोकडे पाहून मी अरुणला इशारा केला. त्याने फोटोकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या फोटोत तोच माणूस होता, ज्याने आम्हाला घर दाखवलं होतं. फोटोवर सुकलेल्या फुलांचा हार घातलेला होता, आणि खाली एक तारीख लिहिलेली होती, जी दिडशे वर्षांपूर्वीची होती. “हा… हा फोटो दिडशे वर्षांपूर्वीचा आहे! म्हणजे हा माणूस दिडशे वर्षांपूर्वी मेलाय?” अरुण ओरडला.
आम्ही दोघे घाबरून पळायला लागलो, पण अचानक दरवाजा बंद झाला. आम्ही जोरजोराने ओरडू लागलो, आणि तेवढ्यात गावातली सगळी लाइट गेली. गावात पूर्ण अंधार झाला. टॉर्चच्या प्रकाशात आम्ही एकमेकांना पकडलं. आतल्या खोलीतून पावलांचा आवाज येत होता, जणू कोणीतरी आमच्याकडे येत होतं. “कोण आहे तिथे?” मी ओरडलो, पण उत्तर आलं नाही. अशोक आणि प्रमोद आमचा आवाज ऐकून धावत आले. अशोकने दरवाजा उघडला आणि आम्ही दोघेही बाहेर पडलो. दरवाजा कुणीतरी बाहेरून बंद केला होता. अशोकने काय झाले म्हणून विचारले आणि घरात टॉर्च मारली. टॉर्चच्या प्रकाशात भिंतीवरचा फोटो स्पष्टपणे दिसू लागला. अशोक आणि प्रमोदच्या चेहऱ्यावरचाही रंग उडाला होता. तेही घाबरले होते. आम्ही अंधारात पळत सुटलो. अंधारामुळे आमचे घरही आम्हाला सापडले नाही शिवाय बाहेरही सगळी घरं एकसारखी दिसत होती. धाडस करून आम्ही एका घरात घुसलो, पण तिथेही तेच दृश्य. तेच फर्निचर, तीच खोली आणि तोच हार घातलेला फोटो.
आम्ही वेगवेगळ्या पाच-सहा घरांमध्ये गेलो, पण प्रत्येक घर एकसारखं होतं. तेच फर्निचर, तीच खोली आणि तोच हार घातलेला फोटो. “हे काय आहे? आपण कुठे अडकलोय?” प्रमोद घाबरून ओरडला. “मला वाटतंय, आपण कुठल्यातरी जादुई चक्रात अडकलोय!” अरुण म्हणाला. आम्हाला आता किल्ल्याची आठवण झाली. “चला, किल्ल्यावर जाऊया. तिथे कदाचित सुरक्षित असेल,” अशोक म्हणाला. आम्ही सगळे धावत किल्ल्याकडे गेलो. किल्ल्यावर पोहोचताच आम्ही थोडा मोकळा श्वास घेतला. पण आम्ही खूप थकलो होतो, आणि तहानही लागली होती. पण आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. “आता इथेच रात्र काढू, सकाळी जे होईल ते पाहू” मी म्हणालो. एकमेकांना पकडून आम्ही किल्ल्याच्या एका कोपऱ्यात बसलो, आणि कधी झोप लागली ते कळलंच नाही.
सकाळी सूर्यप्रकाशाने माझी झोप मोडली. मी डोळे उघडले तेव्हा किल्ल्याच्या जीर्ण भिंती माझ्यासमोर दिसल्या. थंडीमुळे माझे हात गोठले होते, आणि मला आठवण झाली की आम्ही रात्रभर किल्ल्यावरच होतो. मी अशोक आणि अरुणला उठवलं, पण माझी नजर प्रमोदवर गेली. तेव्हा माझा श्वास अडकला. तो तिथे नव्हता. “प्रमोद कुठे आहे?” मी घाबरट आवाजात विचारलं. अशोक आणि अरुणही धडपडत उठले. “काय? तो इथेच होता ना रात्री!” अरुण ओरडला. आम्ही तिघांनी किल्ल्याच्या खोल्यांमध्ये शोधाशोध सुरू केली. प्रत्येक खोलीत धूळ आणि कोळ्यांची जाळी, पण प्रमोदचा काही पत्ता नव्हता. शेवटी एका अंधाऱ्या खोलीत आम्हाला तो भिंतीला टेकून बसलेला दिसला, त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता. “प्रमोद, तू इथे कसा आलास?” मी विचारलं. त्याने भेदरलेल्या नजरेने आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, “मला… मला काहीच आठवत नाही. मी इथे कसा आलो?”
आम्ही त्याला आधार देऊन बाहेर आणलं. गावातलं वातावरण सकाळी अगदी शांत आणि साधारण वाटत होतं, जणू रात्री काहीच घडलं नव्हतं. आम्हाला तेच म्हातारे लोक दिसले, जे काल सकाळी भेटले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तीच विचित्र शांतता होती. “चला, इथून पळ काढूया,” अशोक म्हणाला. आम्ही कोणाशीही न बोलता घराकडे निघालो. आम्ही घाईघाईने बॅगा घेतल्या आणि जीपकडे धावलो. पण जीपजवळ पोहोचताच आम्हाला धक्का बसला. जीपच्या टायर्सवर खोल खरचटलेल्या खुणा होत्या, जणू काही प्राण्यांनी त्यांना चावलं होतं. जीपच्या काचेवर कोणीतरी बोटाने लिहिलेलं होतं, “परत येऊ नका.” “हे… हे काय आहे? हे कोणी लिहिलं?” अरुण घाबरत म्हणाला. “काहीही असो, आता इथे थांबायचं नाही,” मी ठामपणे म्हणालो.
अशोकने जीप स्टार्ट केली, आणि सुदैवाने ती चालू झाली. अशोकने जीप वेगाने चालवायला सुरुवात केली. रस्त्यावरून जाताना आम्ही मागे वळून पाहिलं, तेव्हा गावातली सगळी घरं एकसारखी दिसत होती, आणि त्या घरांच्या खिडक्यांमधून काही अस्पष्ट आकृत्या आम्हाला पाहत असल्यासारख्या वाटल्या. “तिथे बघा!” अरुणने ओरडत खिडकीकडे बोट दाखवलं. एका खिडकीत त्या माणसाचा चेहरा दिसला, जो आम्हाला पहिल्या दिवशी भेटला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक स्मित होतं. आम्ही सगळे घाबरलो आणि अशोकने गाडीचा वेग वाढवला.
रस्त्यावर खड्डे असूनही आम्ही थांबलो नाही. “मी सांगितलं होतं ना, इथे येऊ नका म्हणून!” प्रमोद वैतागून म्हणाला. “आता काय झालंय ते झालंय, घरी पोहोचूया,” मी त्याला शांत करत म्हणालो. आम्ही गावातून बाहेर पडलो, पण रस्त्यावर परत तेच मोठे दगड दिसले, जे आम्ही काल हटवले होते. “हे दगड परत कसे आले?” प्रमोदने कापऱ्या आवाजात विचारलं. “कोणीतरी मुद्दाम ठेवले असावेत,” अशोक म्हणाला, पण त्याचा आवाजही थरथरत होता. आम्ही पुन्हा दगड हटवले आणि जीप वेगाने हाकली.
काही वेळातच मुख्य रस्त्यावर लागलो. जीपमधलं वातावरण तणावपूर्ण होतं. कुणीच बोलत नव्हतं. फक्त इंजिनचा आवाज आणि आमच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. “त्या गावात काहीतरी भयंकर आहे,” अरुणने शेवटी मौन तोडलं. “ते सगळं खरं होतं… ती घरं, त्या फोटोतला माणूस… तो खरंच १५० वर्षांपूर्वीचा होता का?” प्रमोद म्हणाला. आम्ही सगळे शांत झालो. त्या गावातली प्रत्येक गोष्ट, ती एकसमान घरं, तो फोटो, ती विचित्र शांतता, सगळं आमच्या डोक्यात घुमत होतं.
शेवटी रात्री उशिरा आम्ही सुखरूप आमच्या गावात पोहोचलो. घरी पोहोचताच आम्ही सगळ्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. “आपण नशीबवान आहोत की परत आलो,” अशोक म्हणाला. पण त्या रात्रीच्या आठवणी आम्हाला कधीच सोडणार नव्हत्या. आज ३० वर्षांनंतरही ती रात्र आठवली की माझ्या अंगावर काटा येतो. आम्ही त्या गावाबद्दल कुणालाही काही सांगितलं नाही, कारण कोणीच आमचा विश्वास ठेवला नसता. पण एक गोष्ट नक्की, त्या गावात काहीतरी भयानक होतं. ते गाव खरंच शापित होतं का? की आमच्या मनाचा भ्रम होता? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. “पुन्हा कधी बेताळवाडीला जायचं का?” अशोक कधी कधी मस्करीत विचारतो, पण आम्ही सगळे फक्त हसतो आणि विषय बदलतो. त्या गावाचं नाव पुन्हा घ्यायचीही हिम्मत आमच्यात नाही.
पण आज, ३० वर्षांनंतर, मी तुम्हाला हा अनुभव सांगितला, कारण त्या भयानक रात्रीचं सत्य मला सांगावसं वाटलं.