चार मूर्ख

home / चार मूर्ख

“चार मूर्ख” ही अकबर-बिरबलाची मजेशीर कथा आहे, जी अज्ञान आणि अविचाराचे परिणाम हसत-हसत शिकवते. ही कथा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे. A humorous Akbar Birbal story with a strong life lesson.

अकबरचा स्वभाव काहीसा लहरी होता. एके दिवशी संध्याकाळी तो फिरायला जात होता, तेव्हा त्याने विचार केला, “आज काही खास काम नाही, तर आता आपण आपल्या शहरातल्या चार मूर्खाना शोधून काढू.” त्याने बिरबलला आपल्याबरोबर घेतले. नंतर ते दोघे मूर्खाच्या शोधात निघाले.

थोडे चालल्यानंतर त्यांना एक माणूस भेटला. तो घोड्यावर बसला होता. त्याच्या डोक्यावर लाकडाची मोळी होती. ते बघून बिरबलला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “अरे, तू. जर घोड्यावर बसला आहेस, तर लाकडाची मोळी स्वतःच्या डोक्यावर का घेतलीस?”

तो माणूस म्हणाला, “हुजूर ! हा घोडा मला फार प्रिय आहे. माझं वजन तर बिचाऱ्या घोड्यावर आहेच. जर ही मोळीसुद्धा त्याच्यावर ठेवली, तर त्याला किती त्रास होईल! म्हणून ही मोळी मी माझ्या डोक्यावर ठेवली आहे.”

बिरबल अकबरला म्हणाला, “महाराज, बघा, हा एक मूर्ख तर मिळाला.” असे म्हणत ते दोघे पुढे निघाले.

अकबर म्हणाला, “ठीक आहे. आता तीन मूर्खाचा शोध घेणं बाकी आहे.” इकडे तिकडे फिरता फिरता थोडा अंधार झाला. म्हणून दोघे महालाच्या दिशेने परत निघाले. रस्त्यात त्यांनी ‘एका माणसाला पाहिले. तो काहीतरी शोधत होता.

त्याच्याजवळ जाऊन बिरबलने विचारले, “अरे भाऊ, तू इथं काय शोधतोयस?”

तो माणूस म्हणाला, “काल इथं माझ एक नाणं पडलं होतं, तेच शोधतोय.”

बिरबल म्हणाला, “काल पडलेलं नाणं तू आज का शोधतोयस?”

त्या माणसाने सांगितले, “काल मी थकलो होतो, म्हणून आज शोधायला आलोय.”

बिरबलने विचारले, “तुझं नाणं इथंच पडलं होतं काय?”

तो माणूस म्हणाला, “नाही, इथं नव्हतं पडलं. ते तर तिकडे समोरच्या बाजूला पडलं होतं.”

हे ऐकून अकबर अचंबित झाला. तो म्हणाला, “अरे, तू कसा माणूस आहेस? तुझं नाणं तिकडे समोरच्या बाजूला पडलं होतं आणि तू ते इकडे या बाजूला शोधतोयस?”

तो माणूस म्हणाला, “त्या बाजूला काळोख आहे. काहीच दिसत नाही. या बाजूला थोडा उजेड आहे, म्हणून इथं शोधणं सोपं पडेल ना !”

अकबराला हसू आले. बिरबल म्हणाला, “महाराज, हा दुसरा मूर्ख मिळाला.” ते दोघे पुढे निघाले.

नंतर ते दोघे लगेच महालात पोचले. अकबर बिरबलला म्हणाला, “आता दोन मूर्खाना शोधणं बाकी आहे, त्यांना आपण उद्या शोधू.”

बिरबल म्हणाला, “जहाँपनाह, आता त्यांना शोधायला कुठं जावं लागणार नाही. दोन मूर्ख तर इथे हजरच आहेत.”

अकबर म्हणाला, “काय सांगतोस काय ? इथं कोण बरं दोन मूर्ख आहेत?”

बिरबल म्हणाला, “महाराज, मूर्खाच्या शोधात विनाकारणच मी माझा किमती वेळ वाया घालवला. म्हणून मी तिसरा मूर्ख समजला जाणार की नाही?”

अकबरने विचारले, “आणि चौथा?”

बिरबल म्हणाला, “महाराज, माफ करा, कोणतेही कारण नसताना तुम्ही मूर्खाच्या शोधात माझ्याबरोबर भटकत राहिताल. अर्थात चौथा मूर्ख कोण आहे, हे तुम्ही समजून गेला असाल.”

मूर्खाच्या शोधात निघालेला अकबर स्वतःच मूर्ख ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags